शादी का लड्डू... खाये या ...???
लग्न हा विषय खरंतर वर्षानुवर्षे उहापोह झालेला पण तरीही अजूनही बराच बाकी असलेला (खूपच पुरून उरलाय असा...) अनुभव नसणाऱ्यांसाठी आवडीचा आणि अनुभव असणाऱ्यांसाठी जवळचा.. म्हणजेच आत्तापर्यंत सर्वात जास्त सिद्ध झालेल्या म्हणीसारखा "शादी का लड्डू...."
या विषयाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा, प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाची मते वेगळी आणि कदाचित म्हणूनच सर्वात जास्त चर्चा झालेला.
प्रत्येकाचाच अनुभव हा पश्चातापाचा नसतो परंतु लग्न झाल्यानंतर थोडं खाटखूट प्रत्येक नात्यात खूप सहाजिक आहे. याला करणेही बरीच आहेत. त्याची चर्चा आपण नंतर करू. परंतु ज्यांना लग्नाचा पश्चाताप होतो आणि नातं तोडण्यासाठी जेव्हा कोर्टाची पायरी चढावी लागते त्यावेळी असा खूपदा वाटतं की "का करतात हे सगळे लग्न !!...?"
खूपदा असा प्रश्न येतो की, नातं तोडण्यासाठी न्यायालयात आलेली जोडपी नातं तोडताना जितका विचार करतात तितका विचार नातं जोडताना किंवा जोडण्यापूर्वी त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी केलेला असतो का..? आणि असा विचार केला असेल तर नात्यांमध्ये आलेले प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांशी बोलून नातं टिकवण्यासाठी काही प्रयत्न केलेला असतो का...?
लग्नाआधी एकमेकांना आवर्जून आवड काय आहे ते सांगणारे पण काय आवडत नाही या विषयी आपण कधी चर्चा केलेली असते का!!?? आणि असे विचार जर आपल्या डोक्यात येत नसेल तर खरोखर आपण लग्नाळू आहोत का...?? हा विचार प्रत्येक लग्न करणाऱ्यांच्या मनात यायला हवा. सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे मुलींचे आणि मुलांचे वय सरासरी २४ वर्षांपेक्षा जास्तीच असते. लहानपणाची ६ वर्षे सोडली तर बाकी संपूर्ण वर्षे शिक्षण आणि so called settlement मध्ये घालवली जातात. परंतु या settlement च्या दरम्यान प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपले मूल प्रत्येक ठिकाणी यशस्वी व्हावे मग असे असताना लग्नाच्या बाबतीतली प्रगल्भता ते यशस्वीतता विचारात घेतली जात नाही का..??
लग्न जुळवताना सर्वसाधारणपणे सौन्दर्य, नोकरी, पगार, घर, गाडी या सर्वांचा विचार केला जातो जो काही अगदीच चुकीचाही नाहीये परंतु यापुढे जाऊन 'तो' आणि 'ती' एकमेकांना अनुकूल आहेत की नाहीत याचा विचार 'त्याने' आणि 'तिने' च करणे गरजेचे आहे. आवड आणि नावड तंतोतंत एकमेकांशी जुळणे शक्य नाही परंतु तरीही जे आवडत नाही त्या बाबतीत आपण तडजोड करू शकतो का याचा विचार लग्न जुळताना करणे खूप महत्वाचे. उदाहरणार्थ दोघांपैकी कोणीही occasional drinker असेल तर दुसऱ्याला ते चालणार आहे का..?? अथवा ते चालवून घेणार आहेत का...??
साता जन्माच्या आणाभाका हा विषय आता पुरातन काळात जमा झालेला असला तरीही लग्नानंतर एकमेकांसोबत राहताना “या जन्मात तरी आपण आनंदी राहूया” असा विचार करायला काही हरकत नाहीये. तुटणाऱ्या लग्नाला एक शेवटची संधी देऊन ते परत नीट न करण्याइतपत हे बंधन वाईट आहे का..?? अडचणी या प्रत्येक नात्यात असतात तरीही आपण प्रयत्नपूर्वक त्या अडचणींवर मात करायला शिकलं पाहिजे.
सध्याच्या काळात तो किंवा ती या दोघांची परिस्थिती काही वेगळी नसते. तिने घर सोडलेले असते तर त्यानेही त्याचे घर सोडलेले असते. त्यामुळे रूढार्थाने सासर हे ठिकाण देखील आता कालबाह्य झालेले आहे. दोघांनी खूप काही स्वप्न बघून संसार उभा केलेला असतो. मग असा संसार टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे असते.
तरीही अशी वेळ आलीच तर सगळं काही उधळून लावण्या आधी कोणाचातरी सल्ला घ्यावा किंवा कोणालातरी आपल्या मनातील खळबळ सांगावी असा विचार कोणाच्यातरी एकाच्या मनात आला तरी त्यातून पुढे उद्भवणाऱ्या कटू प्रसंगांना टाळता येईल.
दोघांच्याही आई वडिलांशी बोलून प्रश्न सुटत नसतील तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा आणि सर्वांनाच सुसह्य होईल असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.
न्यायव्यस्थेने दिलेला एकमेकांपासून फारकत घेण्याचा मार्ग हा जरी सर्वांसाठी खुला असेल तरीही प्रत्येकाने दुसऱ्या मार्गाचाही वापर करण्याचा प्रयत्न नक्की करावा.
Post a Comment