संवाद
नातं, मग ते कोणताही असो, संवाद हा नात्याचा प्राण आहे. संवादातून आपण विचारांची, भावनांची, अनुभवांची देवघेव करतो.
पती पत्नीमधील संवाद हा वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेचा मुख्य आधारस्तंभ आहे. संवादामुळे पती पत्नी एकमेकांच्या विचारांचा, भावनांचा आणि अपेक्षांचा आदर करतात आणि त्यामुळेच नात्यातील सामंजस्य टिकून राहते.
एक चांगलं लग्न हे कायमच चांगल्या संवादावर टिकून असतं. नातं जुळण्यासाठी, फुलण्यासाठी आणि टिकण्यासाठी संवाद खूप महत्वाचा आहे. वाद हे सगळ्या नात्यामध्ये असतात परंतु नवरा बायकोमधील वाद हे त्यांच्या आयुष्याचे संदर्भच बदलून टाकतात.
खरंतर संवाद साधणं ही एक कलाच म्हणावी लागेल. आधीच दोघांचा संसार, दोघांच्या नोकऱ्या, त्या टिकवण्यासाठीची धडपड तसेच स्वतःच्या क्षेत्रामध्ये ध्येयाचं शिखर गाठण्यासाठी चाललेली चढाओढ या सगळ्यात बिचाऱ्या लग्नाच्या नात्यातील संवाद कुठेतरी हरवला जातो.
पूर्वीच्या काळी हा संवाद वाढवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी खूप मंडळी घरामध्ये असायची. परंतु सध्या असे दिसत नाही म्हणून संसारातील संवाद टिकवण्याची जबाबदारी दोघांचीच...
काय करता येईल बरं मग हा संवाद सुधारण्यासाठी? हा खूप विचारला जाणारा प्रश्न. संवाद सुधारण्यासाठी एकमेकांचे सावधपणे ऐकावे, आपल्या भावना, अपेक्षा स्पष्टपणे मांडाव्यात, एकमेकांच्या भावनांचा आदर करत सन्मान राखावा आणि सर्वात महत्वाचे हे सर्व करण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवावा. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे "व्यक्त होत राहा आणि एकमेकांना सांभाळून घेत राहा."
जीवन जगण्यासाठी प्रत्येकाचेच काही ना काही ध्येय असते परंतु त्यामधीलच एक ध्येय दोघांचं नातं फुलावण्याचं आणि जीवन प्रेममय करण्याचं असेल तर आयुष्य जगायला खूप मजा येईल हे नक्कीच...!!!
Post a Comment