आशीर्वाद - यश – आनंद

आशीर्वाद - यश – आनंद






आशीर्वाद हि अशी एक भावना आहे की जिच्यामध्ये संपूर्ण जीवन बदलून जाईल असे सामर्थ्य आहे. आईकडून मिळणारे आशीर्वाद ही सर्वात मोठी शक्ती मनाली जाते तर गुरूंकडून मिळणारे आशीर्वाद हे ज्ञान मिळण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणूनच आशीर्वाद ही अशी अशी एक भावना आहे जिच्यामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होते.

आशीर्वादरुपी कौतुकाची थाप जर पाठीवर असेल तर कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा मिळते आणि नव्या उत्साहाने प्रत्येक पाउल पुढे टाकण्याची उमेद अंगी जागते. आपल्याला मिळणारे आशीर्वाद हे खरंच अद्भुत काम करतात का..?

कोणीतरी एक शक्ती अथवा व्यक्ती एखाद्या प्रसंगी आशीर्वाद देते आणि अचानक आपल्याला त्याची अनुभूती पण येऊन जाते. हे असं अचानक कायम घडू शकते का...?

एखाद्या यशस्वी दिसणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात खूप अडचणींना तोंड दिलेले असते आणि सतत अविश्रांत प्रयत्न करून मग यश मिळवलेले असते. परंतु बऱ्याच वेळा समाजाला दिसते ते त्याचे यश.

इतरांच्या तुलनेत यशस्वी व्यक्तीने खरोखर काय मिळवलेले असते तर प्रसन्नपणा, समाधान, आनंद, शांतपणा. आणि हे सर्व मिळवण्यासाठी त्याने खूप काही समजून घेतलेले असते, काही गोष्टी, प्रसंग स्वीकारलेले असतात, काही प्रसंग सोडून दिलेले असतात, काही सहन केलेले असते पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि हे सर्व करताना त्याला/तिला झालेला त्रास, वेदना हसत-रडत सहन केलेल्या असतात. अशा प्रकारे तो तावून सुलाखून निघाल्यावर त्याला आयुष्य जगण्याची दृष्टी मिळालेली असते, आणि म्हणून तो मार्गदर्शक होतो, बऱ्या-वाईट प्रसंगात सोबत राहतो आणि गरजेच्या क्षणी रस्ता दाखवतो.

प्रयत्न करताना त्याला एक वस्तुस्थिती लक्षात येते की आपले सुख हे आपल्याच पायाशी असते. एकदा योग्य रस्ता मिळाला की, आपल्याला त्यावरूनच पुढे चालायचे आहे हे कुणी सांगावं अशी गरज राहत नाही. स्वतःशी संवाद साधत तो भाबडेपणा, भ्रम, ऐतखाऊ वृत्ती, स्वप्नाळूपणा हे बाजूला सारून तो ध्येयाकडे अविश्रांत वाटचाल करत राहतो. याचमुळे मनात येणार आकस, मत्सर बाजूला गळून पडतो आणि आयुष्यातले सुख हे आशिर्वादापेक्षा वेगळे रहात नाही.



Post a Comment

Previous Post Next Post